Coronavirus In Akola : आणखी एकाचा बळी; ६६ नवे कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:12 AM2020-07-31T10:12:09+5:302020-07-31T10:12:17+5:30
कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,५७६ वर पोहोचला असून, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०४ वर पोहोचली आहे.
अकोला : कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे, तर ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ३४ अहवाल ‘व्हीआरडीएल’ लॅबमधील, तर २९ अहवाल रॅपिड अॅन्टिजन टेस्टच्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,५७६ वर पोहोचला असून, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०४ वर पोहोचली आहे.
कोरोनाने धुमाकूळ घातला असून, मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी रात्री आणखी एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील रहिवासी होता. तो २० जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. आतापर्यंत कोरोनामुळे १०५ जणांचा बळी गेला. तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून गुरुवारी सकाळी प्राप्त २८४ अहवालापैकी ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी सकाळी प्राप्त ३४ पॉझिटिव्ह अहवालामध्ये १८ महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील मोठी उमरी येथील सात जण, वानखडे नगर व कोठारी येथील प्रत्येक पाच, उगवा व वाडेगाव प्रत्येकी तीन, तेल्हारा, हिवरखेड व भीम नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित राणेगाव तेल्हारा, बाळापूर, शिवसेना वसाहत, रेणुका नगर व केशव नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुष असून, ते कैलाश टेकडी, खदान अकोला व तथागत नगर शिवणी येथील रहिवासी आहेत.
१६ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, तसेच कोविड केअर सेंटर अकोला येथून सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच हॉटेलमधून दोघांना, अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
९११ अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे; मात्र गुरुवारी प्राप्त आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅन्टिजन टेस्टच्या एकूण ९७७ अहवालापैकी ९११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामध्ये ३५८ आटीपीसीआर, तर ५५८ रॅपिड अॅन्टिजन टेस्टच्या अहवालांचा समावेश आहे.