CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; १५ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:02 PM2020-08-12T12:02:26+5:302020-08-12T12:02:39+5:30
कोरोनामुळे बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११८ झाली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले, तरी त्यामध्ये कोणतेही यश येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, बुधवार, १२ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ११८ झाली आहे. दुसरीकडे आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१२३ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे २९६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित २८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये दोन महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये केळकर हॉस्पीटल येथील दोघांसह, गीता नगर, कापसी, जीएमसी, मुर्तिजापूर, भीम नगर, मोठी उमरी, कौलखेड, कृषि नगर, निमकर्दा, जठारपेठ, सस्ती, कोठारी व वाघाडी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनाच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, बुधवारी आणखी एका जणांचा मृत्यू झाला. हा रुग्ण बार्शीटाकळी शहरातील ५५ वर्षीय पुरुष असून, त्यांना ११ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
५६१ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५६१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.