CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:29 AM2020-05-06T11:29:06+5:302020-05-06T16:08:30+5:30
खंगनपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा बुधवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोनाने आता चांगलेच विक्राळ रुप धारण केले असून, गत काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, आता कोरानामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. शहरातील खंगनपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा बुधवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २ मे रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे कोविड-१९ आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. दरम्यान, बुधवारी आणखी दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकुन रुग्णांची संख्या ७७ झाल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेड झोनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ५ मे रोजी कोरोनाचे ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून रुग्णांची एकून संख्या ७५ झाली होती. यामध्ये मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. आज रोजी जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५६, तर एकून रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. जिल्ह्यातील एकून १३ जण कोरोनामुक्त झाले असून, सात जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला आहे. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. बुधवारी, एकून ३१ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी दोन पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत केवळ अकोला शहरातच असलेल्या कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात झाल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. बाळापूर तालुक्यातील अंत्री व बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर हे मुळ गाव परंतु अकोल्यातील शिवनी येथे राहणाºया एकास कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनादेखील क्वारंटीन करण्यात आले असून, त्यांचीदेखील वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच घरातच राहण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.