CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; बाळापूरातील महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:02 PM2020-06-23T12:02:20+5:302020-06-23T12:04:04+5:30
बाळापूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, बाधितांचा व मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २३ जून रोजी बाळापूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अकोला शहरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ६७ वर गेला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२४४ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी एकूण ७६ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोल्यातील दगडी पूल भागातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
दरम्यान, बाळापूर शहरातील एका ५० वर्षीय महिलेचा मंगळवारी पहाटे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदर महिलेला १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे आतापर्यंत एकूण ६७ मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, आतापर्यंत ७६५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, आता ४१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल- ७६
पॉझिटीव्ह- एक
निगेटीव्ह- ७५
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४४
मयत-६७ (६६+१), डिस्चार्ज- ७६५
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२