Coronavirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा १३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:56 PM2020-05-11T17:56:18+5:302020-05-11T17:58:17+5:30
६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १३ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव थांबावा यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र या जीवघेण्या आजाराच्या बळींची संख्याही वाढतच आहे. सोमवार, ११ मे रोजी बैदपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १३ झाली आहे. या रुग्णाला २ मे रोजी दाखल करण्यात आले होते. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद असल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंचा आकडा १४ आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५९ वर पोहचल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी जाहीर करण्यात आले.
रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरात यामध्ये आणखी पाच जणांची भर पडली आहे. सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोग शाळेकडून एकूण ९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच पॉझिटिव्ह, तर ९० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये मोठी उमरी भागातील एक पोलिस, तर किल्ला चौक भागातील ११ वर्षीय बालकाचा समावेश आहे. सायंकाळी आणखी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये आंबेडकर नगर सिव्हिल लाईन्स भागातील २६ वर्षीय युवक,अगरवेस जुने शहर भगातील ५६ वर्षीय महिला व अकोट फैल भागातील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात १३१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज प्राप्त अहवाल-९५
पॉझिटीव्ह-पाच
निगेटीव्ह-९०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १५९
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज- १४
दाखल रुग्ण( पॉझिटिव्ह)- १३१