CoronaVirus In Akola : ‘कोरोना’चे गांभीर्य नाहीच; अकोलेकर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:49 AM2020-03-27T10:49:02+5:302020-03-27T10:51:22+5:30
काहीही गरज नसताना मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात अकोलेकर फिरताना आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदीचा निर्णय लागू केला होता. तरीही नागरिक रस्त्यांवर गर्दी करीत असल्याचे पाहून एक पाऊल पुढे जात संचारबंदी लागू केली. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी पुढील २१ दिवसांकरिता संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. अवघ्या तिसऱ्याच दिवशी (गुरुवारी) काहीही गरज नसताना मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात अकोलेकर फिरताना आढळून आले. ही बाब पाहता झपाट्याने प्रसार होणाºया कोरोना विषाणूचे अकोलेकरांना गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे.
जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूचा देशात शिरकाव झाला असून, सर्वाधिक संशयित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. धोक्याची घंटा लक्षात घेता, या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून विविध निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी गर्दी टाळणे, हा यावरचा ठोस प्रतिबंधात्मक उपाय असल्याने जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या स्तरावर सातत्याने आवाहन केले जात आहे. संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेद्वारा, जनतेसाठी व स्वत:साठी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला. यादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली होती. तरीही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी व समाज रक्षणासाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असताना दुर्दैवाने तसे होत नसल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले.
गल्लीबोळात तरुणांचे घोळके
देश संकटातून मार्गाक्रमण करीत आहे. केंद्र व राज्य शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार एकत्र न येण्याचे नागरिकांना आवाहन केले जात असताना गल्लीबोळात तरुणांचे घोळके चर्चा करीत असताना दिसून आले. स्वत:सोबतच कुटुंबीयांचा व शेजाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे थांबविण्याची गरज आहे.