CoronaVirus in Akola : शहरात ‘कंटेनमेंट’ झोन वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:17 AM2020-05-12T10:17:47+5:302020-05-12T10:17:58+5:30
शहरातील कंटेनमेंट एरियाच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, सोमवारी ही संख्या २५ च्या घरात पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराच्या प्रत्येक प्रभागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे संबंधित परिसराला ‘कंटेनमेंट एरिया’ घोषित करून त्या ठिकाणी मालमत्तांच्या सर्वेक्षणासह नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत शहरातील कंटेनमेंट एरियाच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, सोमवारी ही संख्या २५ च्या घरात पोहोचली आहे. कंटेनमेंट एरियाची संख्या कमी होण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांना ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ७ एप्रिल रोजी उत्तर झोनमध्ये आढळून आला. त्यानंतर उत्तर झोनमधील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळून येतो, तो परिसर मनपा प्रशासनाच्यावतीने ‘कंटेनमेंट एरिया’ म्हणून घोषित केला जात आहे. अशा कंटेनमेंट एरियाची वाढ होणे ही नक्कीच अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे नियोजन करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सरवल्याचे दिसून येत आहे.
हा परिसर ‘कंटेनमेंट एरिया’
बैदपुरा, अकोट फैल, सिंधी कॅम्प, कृषी नगर, खैर मोहम्मद प्लॉट, डाबकी रोडवरील मेहरे नगर, वाशिम बायपास येथील कमला नगर, सुधीर कॉलनी येथील रविनगर, शिवर, ढोणे कॉलनी, जय हिंद चौक, अकोट फैल येथील शंकर नगर, गुलजारपुरा आरपीटीएस रोड, शिवणी, न्यू राधाकिसन प्लॉट, मालीपुरा, अगरवेस, जुना आळशी प्लॉट येथील चिवचिव बाजार, तारफैल, अक्कलकोट, हरिहरपेठ, बापूनगर, रामनगर येथील म्हाडा कॉलनी, गडंकी आरपीटीएस रोड, तारफैल येथील भवानी पेठ, आझाद कॉलनी, मोठी उमरीस्थित विठ्ठल नगर.
‘कंटेनमेंट एरिया’च्या संख्येत वाढ होणे हा चिंतेचा विषय आहे. अर्थात, कोरोनाच्या प्रसाराला व प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच या गोष्टींचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा नाइलाजास्तव प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वाढ करावी लागेल.
- संजय कापडणीस,
आयुक्त, मनपा