CoronaVirus in Akola : ‘एमआयडीसी’तून होऊ शकतो कोरोना उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:12 AM2020-04-27T10:12:40+5:302020-04-27T10:14:42+5:30
एमआयडीसीतून केव्हाही कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही धोक्याची घंटा आहे, अशी शक्यता येथील उद्योजकांनी वर्तविली आहे.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची पाहिजे तशी खबरदारी घेतली जात नसल्याने अकोला एमआयडीसी कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. एमआयडीसीतून केव्हाही कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही धोक्याची घंटा आहे, अशी शक्यता येथील उद्योजकांनी वर्तविली आहे.
माल वाहतुकीच्या निमित्ताने अकोला एमआयडीसीत दररोज ३०० ट्रक चालक आणि ३०० वाहक ये-जा करीत असतात. केवळ कारखाना परिसरातच चालक-वाहक लोक मास्कचा वापर करतात. इतर ठिकाणी त्यांचा मुक्त संचार असतो. एमआयडीसीत आल्यानंतर प्रत्येक ट्रक येथील धर्मकाट्यावर वजनमापासाठी जात असतो. त्यानंतर माल भराई आणि माल उतारण्यापर्यंत ही मंडळी याच परिसरात वावरते. जेवण आणि इतर दिनचर्येसाठी ही मंडळी बराच वेळ या परिसरात वावरत असते. राज्यातील आणि राज्याबाहेरील बाधित परिसरातून ही मंडळी दररोज अकोल्यात येते.
अकोल्यात आल्यानंतर या लोकांची किमान प्राथमिक आरोग्य तपासणी व्हायला हवी; मात्र तीदेखील होत नाही. दिवसभर अकोल्यात वावरून ही मंडळी पुन्हा त्यांच्या गावाकडे रवाना होत आहेत. एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळच चेकपोस्ट तयार करून या चालक-वाहकांची आरोग्य तपासणी व्हायला हवी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.
कामगारांची पायपीट
लॉकडाउनच्या कार्यकाळात एमआयडीसीत सेवा देणाऱ्या कामगारांना येण्या-जाण्यासाठी कोणतेही वाहन नाही. यासाठी महापालिकेने त्यांच्या बंद पडलेल्या बसेस जर एमआयडीसीला भाडेतत्त्वावर दिल्या आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ची नियमावली आखून दिली तर अनेक समस्या सुटू शकतात.
अग्रवाल वजनकाट्याजवळचा दोन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट चेकपोस्टसाठी द्यायची तयारी आहे. इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इतर व्यापारी संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा अकोला एमआयडीसी कोरोनाचा हॉटस्पॉट होईल.
-विनीत बियाणी,
अध्यक्ष, महाराष्ट्र सोप अॅण्ड डिटर्जन्ट असोसिएशन,
अकोला.