Coronavirus in Akola : जुने शहराची तटबंदी भेदली; रुग्णाचा मृत्यू, प्रतिबंधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 11:19 PM2020-05-01T23:19:51+5:302020-05-01T23:43:46+5:30
जुने शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
अकोला: जीवघेण्या कोरोना व्हायरसने जुने शहरात 'एन्ट्री' केली असून प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या खैरमोहम्मद प्लॉट येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी मनपा प्रशासनानेवतीने खैरमोहम्मद प्लॉट भागाला केंद्रबिंदू मानत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.
अकोला महापालिका क्षेत्रात उत्तर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सात एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आजरोजी शहरातील पूर्व झोन, उत्तर तसेच दक्षिण झोनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी त्यामध्ये पश्चिम झोनची भर पडली. या भागातील प्रभाग क्रमांक ९ मधील खैरमोहम्मद प्लॉट येथील ५६ वर्षीय भाजी व फळ विक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. ही व्यक्ती मागील महिनाभरापासून आजारी असल्याने त्याने त्याच भागातील एका खाजगी डॉक्टरकडून उपचार घेतल्याची माहिती आहे.
'तो'रुग्ण टिळक पार्क परिसरातील नाहीच!
शुक्रवारी पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरातील एका ७८ वर्षीय वयोवृद्ध इसमाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला. सदर इसमाच्या मुलाचे टिळक पार्क परिसरात खाजगी हॉस्पिटल असल्याने या रुग्णाचा सुद्धा याच भागात रहिवास असल्याच्या अफवेने रामदास पेठ भागातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती. अखेर हा रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.
शनिवारपासून सर्वेक्षणाला प्रारंभ
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार पश्चिम झोनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांनी गूगल मॅपच्या आधारे खैरमोहम्मद प्लॉट परिसराचा नकाशा तयार केला. पोलीस प्रशासनाला अवगत केल्यानंतर हा परिसर शुक्रवारी रात्रीपर्यंत सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. उद्या शनिवारपासून या भागात निर्जंतुकीकरणची प्रक्रिया व सर्वेक्षणाला प्रारंभ केला जाणार आहे.
शहरात शुक्रवारी कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी जुने शहरातील खैरमोहम्मद प्लॉट येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाची लागन झालेले ७८ वर्षीय इसम बैदपुरा भागातील रहिवासी असून त्यांचा रामदास पेठ भागात मुक्काम नाही. या भागातील नागरिकांनी भीती न बाळगता घरातच राहून स्वतःची काळजी घ्यावी. - संजय कापडणीस, आयुक्त, मनपा अकोला.