CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:32 PM2020-10-07T12:32:42+5:302020-10-07T12:32:58+5:30
CoronaVirus in Akola : अकोला शहरातील एक व दहीहांडा येथील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४८ वर गेला आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. बुधवार, ७ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील एक व दहीहांडा येथील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४८ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७०७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर, मलकापूर, तापडिया नगर व पारद ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, जठारपेठ, न्यू भीमनगर, लेबर कॉलनी, गजानन नगर, गांधीग्राम, वरूर जाऊळका ता.अकोट, आलेगाव ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
कोरोनामुळे बुधवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये कृषी नगर , सिव्हील लाईन येथील ४३ वर्षीय महिला व दहीहंडा येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २४ व २६ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
८५० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६६०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८५० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.