CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:05 PM2020-09-05T13:05:34+5:302020-09-05T13:05:57+5:30
पातूर तालुक्यातील कापशी तलाव, व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६५ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व नव्याने संसर्ग होणाऱ्यांंची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी पातूर तालुक्यातील कापशी तलाव, व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६५ झाली आहे. तर आणखी ८१ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४४४९ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये ३१ महिला व ५० पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये पातूर तालुक्यातील तांदळी येथील ३८ जणांसह, पिंजर येथील १२ जण, भटवाडी बु. येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, केशव नगर येथील तीन जण, गोरक्षण रोड, लहान उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर मंगरुळ, बाळापूर, मालेगाव बाजार, रेणूका नगर, जूने खेतान, राजपूतपुरा, टिळक वाडी, पंचगव्हाण, अमानखॉ प्लॉट, रवि नगर, भारती प्लॉट, रामनगर व बेलूरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
कापशी, मुर्तीजापूरातील रुग्णांचा मृत्यू
शनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर तालुक्यातील कापसी तलाव येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेस २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचाही बुधवारी मृत्यू झाला. त्यांनाही २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
९१० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,४४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,३७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९१० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.