CoronaVirus in Akola : 'डिस्चार्ज' देऊन घरी पाठविलेला युवक पुन्हा 'पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:01 PM2020-06-05T12:01:08+5:302020-06-05T12:01:15+5:30
युवकाचा रिपोर्ट पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबालाही बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अकोला : देशमुख फैल परिसरातील रहिवासी असलेल्या एका २७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात त्याला घरी पाठविण्याचा प्रताप सर्वोपचार रुग्णालय व महापालिका प्रशासनाने केला. या युवकाचा रिपोर्ट पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबालाही बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, बाधित तरुणाचा व्हिडिओ हा त्याचा पुरावा असून, या गंभीरप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अक्षम्य हलगर्जीमुळे अकोल्यात कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला आहे, असा आरोपही पातोडे यांनी केला.
बाधित रुग्णाने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, माझे स्वॅब १९ मे रोजी तपासणीला दिले होते. २१ तारखेला माझा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मला सर्वोपचारमध्ये दाखल केले. पाच दिवसाचा उपचार केल्यानंतर मला डिस्चार्ज कार्ड देऊन पीडीकेव्ही येथे विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. डिस्चार्ज कार्डवर १ मे ते १४ मे २०२० असा चुकीच्या तारखेचा उल्लेख करण्यात आला. विलगीकरण कक्षातून मला २९ मे रोजी सायंकाळी घरी सोडून देण्यात आले. पीडीकेव्ही येथून मला कोणतेही औषध दिले नाही. मी स्वॅब टेस्टची मागणी केल्यानंतर कोणत्याही अधिकाºयाने माझ्याशी संवाद साधला नाही; मात्र पुढील दोन दिवस माझ्या घशात सतत खवखव आणि अति अशक्तपणा मला जाणवला. परत परत ताप येत होता. त्यामुळे मी जीएमसीला फोन केला. त्यांनी मला ओपीडीमध्ये दाखवायचे सांगितले. २ जूनला मला अॅडमिट करण्यात आले व ४ जूनला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असे तरुणाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या तरुणाच्या संदर्भात झालेल्या गलथानपणाची तक्रार पातोडे यांनी केली असून, कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा प्रशासन, सर्वोपचार रुग्णालय आणि महापालिकेतील अधिकारी गंभीर नसल्याने अकोला जिल्ह्यासाठी तातडीने तीन स्वतंत्र आयएएस अधिकारी नोडल म्हणून नेमण्यात यावे, तसेच बाधित रुग्णाला घरी पाठविल्याप्रकरणी दोषींविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई
सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाच दिवस त्याला सर्वोपचार रुग्णालयातच ठेवण्यात आले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात रुग्ण हा पीडीकेव्ही येथील संस्थागत अलगीकरणामध्ये होता. सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच रुग्णसेवा दिली; परंतु रुग्णाने पुन्हा तपासणीसाठी चुकीचे नाव सांगून नमुने दिल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने दिली; मात्र या संदर्भात प्रशासनाकडून अधिक बोलण्यास नकार देण्यात आला .