राज्यापेक्षा जिल्ह्याचा मृत्यूदर ०.६९ टक्क्यांनी जास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 10:47 AM2020-10-31T10:47:03+5:302020-10-31T10:51:10+5:30
Akola CoronaVirus राज्याच्या तुलनेत हा मृत्यूदर ०.६९ टक्क्यांनी जास्त आहे.
अकोला: राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा ०. ६९ टक्क्यांनी जास्त आहे. गत महिनाभरात जिल्ह्यातील मृत्यूदर हा ०.०९ टक्क्यांनी वाढला असून, ही बाब अकोलेकरांची चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे वेळीच सतर्क होऊन योग्य वेळेत उपचार घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले होते. ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाल्याने अकोलेकरांना थोडा दिलासा मिळाला. तर दुसरीकडे कोरोनाचा मृत्यूदर वाढताच आहे. राज्यात कोरोनाचा मृत्यूदर हा २.६३ टक्के आहे; मात्र जिल्ह्याचा मृत्यूदर हा ३.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या तुलनेत हा मृत्यूदर ०.६९ टक्क्यांनी जास्त आहे. असे असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर असून, तो राज्याच्या तुलनेत जास्त आहे.
अकोला ३.३२ मृत्यूदर
कोरोनामुक्ती दर - ९३ टक्के
पॉझिटिव्हीटी रेट - ७ टक्के
जिल्ह्याची परिस्थिती
बरे झालेले रुग्ण - ७,८६४
उपचार सुरू - २४१
बळी - २७९
कारण काय
बहुतांश रुग्ण दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे कोरोनाचे इन्फेक्शन वाढते. उशिरा उपचार मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. गत महिनाभरात दोन रुग्णांचा मृत्यू उपचार मिळण्यापूर्वीच झाल्याची माहिती आहे.
कोरोनाचा मृत्यूदर रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे. शिवाय, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित हात धुवावेत, मास्कचा वापर करावा. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला