CoronaVirus in Akola : २१ दिवसात दुपटीने मृत्यू : नागपूरच्या तुलनेत ३.९ ने जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 09:57 AM2020-06-22T09:57:00+5:302020-06-22T09:57:14+5:30
अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, वेळीच सावध होण्याची गरज आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत २० दिवसांत कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढली आहे. २१ जूनपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ५.५ टक्क्यांवर पोहोचला असून, नागपूरच्या तुलनेत ३.९ ने जास्त आहे. हा विदर्भातील सर्वाधिक मृत्यूदर आहे. धक्कादायक बाब म्हणजे गत २१ दिवसांतच मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे. अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, वेळीच सावध होण्याची गरज आहे.
७ एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. अतिशय संथ गतीने रुग्णवाढ सुरू असताना ११ एप्रिल रोजी एका पॉझिटिव्ह रुग्णाने उपचारादरम्यान आत्महत्या केली होती.
त्यानंतर लगेच चौथ्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. ३१ एप्रिलपर्यंत मृत्यूचा आकडा ४ होता; मात्र मे महिन्यात मृत्यूची संख्या झपाट्याने वाढू लागली. मे महिन्यात दिवसाला सरासरी एकाचा मृत्यू या प्रमाणे ३० दिवसात २८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला; मात्र कोरोनाने जूनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली असून, २० दिवसांतच मृत्यूचा आकडा दुपटीने वाढविला.
एप्रिल, मे या ६१ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यूची संख्या ३२ वर पोहोचली होती. तर जूनमध्ये ३४ चा आकडा गाठण्यासाठी केवळ २१ दिवसांचाच कालावधी लागला. कोरोनाचा हा मृत्यूदर विदर्भात सर्वाधिक असून, अकोलेकरांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.
सर्वाधिक रुग्ण ५० वर्षावरील
मृत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ५० वर्षावरील वयोगटातील आहे. या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार, हृदयविकार यासह इतर गंभीर स्वरूपाचेही आजार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.