CoronaVirus in Akola : ‘डबलिंग रेट’ २३५ दिवसांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:23 AM2020-07-21T10:23:43+5:302020-07-21T10:24:14+5:30

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातून अकोला महापालिका प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती आहे.

CoronaVirus in Akola: 'Doubling rate' in 235 days! | CoronaVirus in Akola : ‘डबलिंग रेट’ २३५ दिवसांवर!

CoronaVirus in Akola : ‘डबलिंग रेट’ २३५ दिवसांवर!

Next

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेच्या यंत्रणेला यश येत असून, शहरातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी घसरण लक्षात घेता रुग्णसंख्येचा डबलिंग रेट चक्क २३५ दिवसांच्या कालावधीवर पोहोचला आहे. डबलिंग रेट लक्षात घेता आजच्या घडीला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातून अकोला महापालिका प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातून कोरोना विषाणूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण प्रभाग क्रमांक २ मधील अकोट फैल परिसरात आढळून आला होता. सुरुवातीच्या कालावधीत कोरोनो विषाणूबद्दल अकोलेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असल्याने नागरिकांच्या तपासणीसाठी जाणाऱ्या शिक्षक व आशा वर्कर यांच्या पथकांना धमक्या, शिवीगाळ करून अक्षरश: हाकलून लावण्यात आल्याचे समोर आले होते. तसेच कंटेनमेन्ट झोनमध्ये मुक्त संचार कायम ठेवत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला चांगलाच हातभार लावला. परिणामी ऐन उन्हाळ्यात कोरोना विषाणूचे पीक शहरात जोमाने फोफावल्याचे दिसून आले. संभाव्य धोका ओळखून मनपा प्रशासनाने तातडीने नमुना संकलन केंद्र सुरू केले. त्या ठिकाणी संशयित रुग्णांची चाचणी करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतल्यामुळे रुग्णांची संख्या समोर आली. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण झाली आहे. या विषाणूच्या रुग्णसंख्येचे निकष लक्षात घेता आजच्या घडीला शहरातील रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी पुढील २३५ दिवस लागतील असा निष्कर्ष आरोग्य विभागाच्या स्तरावर काढण्यात आला आहे.

रुग्णसंख्या झपाट्याने घसरली!
महापालिका क्षेत्रात मे ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख चढता होता. मागील काही दिवसांपासून या संख्येत झपाट्याने घसरण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. इतक्या कमी कालावधीत रुग्णसंख्येत घसरण होत असल्याची बाबही प्रशासनाने गंभीरतेने घेतली आहे.


शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घसरण झाली आहे. वर्तमान स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता याच संख्येला दुप्पट होण्यासाठी पुढील २३५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे तूर्तास दिसून येत आहे. वेळप्रसंगी यामध्ये बदलही होऊ शकतो.
- संजय कापडणीस, आयुक्त मनपा

Web Title: CoronaVirus in Akola: 'Doubling rate' in 235 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.