CoronaVirus: अकोला ‘हर्ड इम्युनिटी’पासून दूरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:46 AM2020-10-11T10:46:02+5:302020-10-11T10:50:28+5:30
CoronaVirus, Herd immunity, Serological Survey कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी.
अकोला : ‘सेरो’ सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील २० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच केवळ दोन लाख लोकसंख्या कोरोनामुळे संक्रमीत झाली आहे. त्यामुळे सध्यातरी अकोलेकर ‘हर्ड इम्युनिटी’पासून दूरच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
विदर्भात नागपूरसह अकोल्यात जून, जुलै महिन्यात कोरोनाने कहर केला होता, तर सप्टेंबर महिना आतापर्यंतचा सर्वाधिक घातक महिना ठरला. दरम्यानच्या काळात आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ‘सेरो’ सर्वेक्षण करण्यात आले. ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २,९७५ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. जिल्ह्यात किती लोकांना कोरोना होऊन गेला, याचा अंदाज यावा, या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ दोन लाख, ७५००२ व्यक्तींना कोरोना होऊन गेला. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या केवळ १५.१६ टक्के आहे. सर्वेक्षणानुसार, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने अद्यापतरी अकोलेकरांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झालेली नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अकोलेकरांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही डॉक्टरांकडून केले जात आहे.
दुसऱ्या लाटेची शक्यता!
मागील सहा महिन्यांत जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. मध्यंतरी कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ -उतार झाला, तर आॅक्टोबर महिन्याची सुरुवातही दिलासादायक झाली; मात्र आगामी सण, उत्सव अन् वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली ही अकोलेकरांसाठी चांगली बाब आहे; मात्र नागरिकांनी बेफिकीरी करून चालणार नाही. गर्दी करणे टाळा, मास्कचा वापर करा, नियमित साबणाने हात धुवा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी योग्य खबरदारी आवश्यक आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.