CoronaVirus in Akola : पाच ‘निगेटिव्ह’; अकोल्याचा एक संशयित हिंगोलीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:20 AM2020-03-28T10:20:48+5:302020-03-28T10:23:17+5:30
सर्वच रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले असून, सर्वच रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. ही बातमी अकोलेकरांना दिलासा देणारी असली तरी, धोक्याची घंटा कायम आहे. अकोल्यातील शासकीय सेवेत कार्यरत ३० वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर हिंगोली येथे आयसोलेशन कक्षात कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून दाखल आहे. मूळ हिंगोली येथील रहिवासी असलेले ते प्रशिक्षणार्थी डॉक्टर अकोल्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. २३ मार्च रोजी प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी शासकीय शिक्षण संस्थेतून सुटी घेतली. हिंगोली येथे पोहोचताच २७ मार्च रोजी त्यांना तेथील आयसोलेशन कक्षात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून, दोन दिवसांनंतर अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे सध्यातरी अकोल्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला तरी, अकोलेकरांवर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.
४८ नागरिक ‘होम क्वारंटीन’!
विदेशातून आलेल्या १२३ प्रवाशांपैकी १२२ प्रवासी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहेत. प्राथमिक वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना ‘होम क्वारंटीन’मध्ये ठेवण्यात आले आहे. यातील ६८ प्रवासी नागरिकांनी ‘होम क्वारंटीन’चा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची यातून सुटका करण्यात आली. ४८ नागरिक अद्याप ‘होम क्वारंटीन’मध्ये आहेत. एक प्रवासी अद्यापही आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात नाहीत.
सर्वोपचारमध्ये १९५९ रुग्णांची वैद्यकीय तपासणी
सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षामध्ये आतापर्यंत एक हजार ९५९ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये शुक्रवारी १४४ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.