‘कोरोना’चे सावट; अकोला शहराचा सर्व्हे करण्यासाठी ४८ पथकांचे गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:44 PM2020-03-27T13:44:07+5:302020-03-27T13:44:19+5:30
संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यासाठी ४८ पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेतला.
अकोला: कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असताना गुढीपाडव्याच्या सबबीखाली महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र बंद असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे शहरात मुंबई, पुणे, नागपूर तसेच परराज्यातून दाखल झालेल्या नागरिकांची नोंद होऊ शकली नाही. वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारावर भाजप लोकप्रतिनिधींसह महापौर अर्चना मसने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर गुरुवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यासाठी ४८ पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेतला.
शहरात मुंबई, पुणे, नागपूर यासह परदेशातून दाखल झालेल्या नागरिकांच्या नोंदी ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयुक्त संजय कापडणीस यांनी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर सोपविली होती. कोरोना विषाणूचे गांभीर्य नसल्यामुळे की काय, मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सुरुवातीपासूनच बेफिकीर असल्याचे समोर आले आहे. गत ६ मार्चपासून शहराच्या विविध भागात परदेशातून तसेच पुणे, गोवा, मुंबई, भोपाळ यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झाले आहेत. याविषयी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही बाहेरगावाहून येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवल्या जात नसल्याची गंभीर बाब उजेडात आली होती. या प्रकाराची दखल घेत गुरुवारी आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मनपा प्रशासनाचा आढावा घेतला. यावेळी आजपर्यंत शहरात दाखल झालेल्या सर्वच नागरिकांची नोंद घेण्यासाठी ४८ पथकांचे गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पथकात मनपा कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांचा समावेश राहणार आहे.
महापौरांचे निर्देश; अंमलबजावणीकडे लक्ष
* जंतुनाशक फवारणीसाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवा
* कोरोनाच्या धर्तीवर गैरहजर किंवा कामचुकारपणा करणाºयांना तंबी
* मनपाच्या उपाययोजनांची नागरिकांना ‘एसएमएस’द्वारे माहिती द्या
* चारही झोनमधील भाजी बाजारात १ मीटर अंतराची आखणी करा
* अकोलेकरांची समस्या निकाली काढण्यासाठी सजग राहा
* कोणत्याही समस्येसाठी २४ तास टोल फ्री हेल्पलाइन नंबर 18002335733/0724-2434412 जारी.