CoronaVirus in Akola : दिवसभरात चौघांचा मृत्यू; सात पॉझिटिव्ह, ८५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 06:16 PM2020-10-09T18:16:37+5:302020-10-09T18:16:43+5:30
CoronaVirus in Akola: आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शुक्रवार, ९ आॅक्टाबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७६० झाली आहे. दरम्यान, ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये दिग्रस ता. पातूर, व्याळा ता.बाळापूर, जीएमसी क्वॉर्टर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.
उपचारादरम्यान चौघे दगावले
शुक्रवारी आणखी चौघांंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये निंभोरा येथील ५६ वर्षीय पुरुष, फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुष व वाडेगाव, ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. उपरोक्त चौघांनाही अनुक्रमे ७ आॅक्टोबर, १८ सप्टेंबर, २३ सप्टेंबर व २९ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
८५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर, अकोला येथून पाच, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अवधाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक , हॉटेल रिजेन्सी येथून एक तसेच होमक्वारंटीनचा कालावधी पूर्ण झालेले ५० अशा एकूण ८५ जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
७२७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६७८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.