CoronaVirus in Akola : दोन दिवसात चौघांचा मृत्यू; ३३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:25 AM2020-08-17T10:25:42+5:302020-08-17T10:25:55+5:30
मागील दोन दिवसात आणखी चौघांचा मृत्यू झाला.
अकोला : कोरोनाचा कहर सुरूच असून, गत दोन दिवसांत आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा १३५ वर पोहोचला आहे. तर गत दोन दिवसात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णवाढ आणि मृत्यूच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.
मागील दोन दिवसात आणखी चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ५५ वर्षीय पुरुष रुग्ण मूर्तिजापूर येथील रहिवासी असून, तो ९ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. तर दुसरा ६४ वर्षीय रुग्ण हा न्यू राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी असून, तो ५ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. तसेच वाल्मीक नगर, अकोट येथील ६० वर्षीय रुग्णाचाही शनिवारी मृत्यू झाला. हा रुग्ण १४ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. तर चौथा मृत्यू जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय रुग्णाचा झाला. तो १० आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. शनिवारी प्राप्त १८ पॉझिटिव्ह अहवालामध्ये पाच महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील दहीगाव गावंडे येथील तीन जण, शिवणी, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जोगेश्वर प्लॉट, हिंगणा रोड अकोला, नानक नगर निमवाडी, देशमुख फैल, अकोट, तेल्हारा व हिवरखेड तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. रविवारी सकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सहा महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील नऊ जण मूर्तिजापूर येथील, तर दोन जण बार्शीटाकळी येथील रहिवासी आहेत. उर्वरित वाडेगाव, कृषी नगर व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच रॅपिड अॅन्टिजन टेस्टमध्ये बार्शीटाकळी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
१६ दिवसांत ३० मृत्यूची नोंद
जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र आॅगस्ट महिन्यातील गत १६ दिवसात तब्बल ३० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गत चार महिन्यांच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास येत आहे.