CoronaVirus in Akola : आणखी चार संशयित दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:34 AM2020-03-27T10:34:14+5:302020-03-27T10:36:45+5:30
चार संशयित रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आतापर्यंत कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला, तरी दररोज संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी आणखी चार संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले असून, सद्यस्थितीत सात रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. तर चार संशयित रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येईल.
सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात बुधवारपर्यंत कोरोनाचे पाच संशयित रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघांचे बुधवारी रात्री, तर दोघाचे गुरूवारी वैद्यकीय चाचणीचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. त्यानंतर लगेच चार नवे संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाले. या चौघांचे वैद्यकीय अहवाल चाचणीसाठी शुक्रवारी सकाळीच पाठविण्यात येणार आहेत, तर तिघांच्या वैद्यकीय चाचणीचे अलवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या तरी आयसोलेशन कक्षात कोरोनाचे सात संशयित रुग्ण दाखल आहेत. चार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात येईल. शिवाय, आणखी एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली असून, त्याचा वैद्यकीय अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला होता.
कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अकोलेकरांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १९ ‘निगेटिव्ह’
कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या २६ रुग्णांपैकी १९ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा पॉझिटीव्ह नसल्याने अकोलेकरांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे; परंतु आणखी सात जणांचे अहवाल प्रलंबित असून, संकट टळले नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.