CoronaVirus in Akola: कोरोना रुग्णांचा आलेख चढताच; आणखी चार पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण २६१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:05 AM2020-05-18T11:05:43+5:302020-05-18T11:07:36+5:30
एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६१ वर गेली आहे.
अकोला : शहरातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच असून, सोमवार, १८ मे रोजी यामध्ये आणखी चार नव्या रुग्णांची भर पडली. सोमवारी आणखी चार जणांचे कोरोना संसर्ग चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६१ वर गेली आहे. आतापर्यंत ११७ जणांना रुग्णालयातून सुटी, तर १८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्या १२६ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भात नागपूरनंतर अकोल्यातच सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून, दररोज यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. रविवार एकाच दिवशी तब्बल ३७ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या २५७ झाली होती. यामध्ये सोमवारी सकाळी आणखी चौघांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी १०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १०४ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे रुग्ण फिरदौस कॉलनी, सुभाष चौक-रामदासपेठ, मोमीनपुरा-ताजनापेठ व सावंतवाड- रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत. अकोला शहरात नवनविन प्रभागांमध्ये रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १७ जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता १२६ रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २६१
मयत-१८(१७+१),डिस्चार्ज- ११७
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १२६
आज प्राप्त अहवाल-१०८
पॉझिटीव्ह-चार
निगेटीव्ह-१०४