CoronaVirus in Akola : तब्बल ४०२ अहवाल निगेटिव्ह; २१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 06:14 PM2020-07-17T18:14:56+5:302020-07-17T18:53:45+5:30
एकूण ४२३ कोरोना संसर्ग चाचणी अहवालांपैकी तब्बल ४०२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्ग थांबला नसला, तरी त्याचा वेग मात्र कमी झाल्याची चिन्हे आहेत. शुक्रवार, १७ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त एकूण ४२३ कोरोना संसर्ग चाचणी अहवालांपैकी तब्बल ४०२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित २१ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २०४९ झाली आहे. दरम्यान, २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारीवारी सकाळी २९७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांमध्ये अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा आणि पातूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. यामध्ये उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर, मुर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, १६६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २८२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२७ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून २२ तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा एकूण २७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये तेल्हारा, मुर्तिजापूर आणि मलकापूर-अकोला येथील रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या २२ जणांपैकी आठ जण बाळापूर येथील, पाच जण अकोट येथील, चार जण महान येथील, दोन जण चांदूर येथील, तर बार्शीटाकळी, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.