CoronaVirus in Akola : ‘कोरोना’ वॉर्डात ड्युटी म्हणून शेजाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:41 AM2020-03-27T10:41:05+5:302020-03-27T10:43:49+5:30
शेजारी त्यांच्यापासून दूर पळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘कोरोना’चं नाव ऐकताच अंगावर शहारे येतात; पण याच जीवघेण्याविषाणूपासून रुग्णांच्या बचावासाठी वैद्यकीय क्षेत्रातील हजारो कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करण्याऐवजी शेजारी त्यांच्यापासून दूर पळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे सध्या वैद्यकीय सेवा देणाºया सहकार्यांचे मनोबल उच्चावण्याची गरज आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये शेजार धर्माला खूप महत्त्व आहे. अडचणीच्या काळात नातेवाइकांपेक्षा शेजारीच धावून येतात, हे खरं असलं, तरी ‘कोरोना’मुळे शेजार धर्माची व्याख्याच बदलल्याचा अनुभव अकोल्यातील काही डॉक्टर व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आला आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय सेवेत त्यातही कोरोना कक्षात सेवा देणाºया डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाºयांना हा अनुभव रोजच येत आहे. येथील कोरोना समुपदेशन कक्ष तसेच आयसोलेशन कक्षात कार्यरत डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवा करून घरी परतले की, काहींचे शेजारी त्यांना पाहूनच घरात जातात. तर काहींच्या कुटुंबीयांसोबत शेजाºयांनी बोलणंदेखील बंद केल्याचा अनुभव काही वैद्यकीय कर्मचाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणाºया या देवदूतांना मिळणारी अशी वागणूक कितपत योग्य आहे, याचं मंथन करण्याची गरज आहे.
खबरदारी हवी; पण प्रोत्साहनदेखील आवश्यक!
‘कोरोना’ कक्षात रुग्णसेवा देत असताना येथे कार्यरत वैद्यकीय कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण त्यासाठी हे कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत आहेत. ते घरी परतल्यावर त्यांच्यासोबत शेजाºयांचा संपर्क येत असेल तर आवश्यक खबरदारी घ्या; मात्र त्यांना प्रोत्साहनदेखील द्या.
काय आहे वैद्यकीय कर्मचाºयांचा अनुभव?
- घरी पोहोचताच शेजारील लोक बोलणे टाळतात.
- बघताच मास्क लावतात. नाकाला रुमाल लावतात.
- शेजारच्या मुलांना त्यांच्या मुलांसोबत खेळू देण्यासही टाळतात.