CoronaVirus in Akola : शून्य ते २० वयोगटातील एकाही बालकाचा मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:39 AM2020-10-16T10:39:04+5:302020-10-16T10:42:21+5:30
Akola News, Coronavirus दिलासादायक बाब म्हणजे ० ते २० वर्ष वयोगटातील एकालाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला नाही.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीची गती मंदावली असली, तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी सर्वाधिक १३१ मृत्यू ६० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांचे झाले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ० ते २० वर्ष वयोगटातील एकालाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला नाही. कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज एकाचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाला असून, यातील १३१ रुग्ण हे ६० वर्षावरील वयोगटातील आहे. तर एवढेच मृत्यू २१ ते ६० वर्ष वयेगटातील रुग्णांचे झाले आहे. यामध्ये ५१ ते ६० वयोगटातील ७२ मृत्यूंचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे ० ते २० वर्ष वयोगटातील एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
सर्वाधिक रुग्णसंख्या ३१ ते ४० वर्ष वयोगटातील
मृत्यूचा दर ६० वर्ष वयोगटातील रुग्णांमध्ये जास्त असला, तरी रुग्णसंख्या वाढीचा दर ३१ ते ४० वर्ष वयोगाटत जास्त आहे. या वयोगाटत १५६० म्हणजेच एकूण रुग्णसंख्येच्या १९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. तर २१ ते ३० वर्ष वयोगटात १८.६ टक्के, ४१ ते ५० वर्ष वयोगटात १७.४ टक्के, ५१ ते ६० वर्ष वयोगटात १६.८ टक्के, ६० पेक्षा जास्त वर्ष वयोगटातील १५.५ टक्के रुग्ण आढळले आहेत, मात्र ११ ते २० वर्ष वयोगटात ८.७ आणि ५ ते १० वर्ष वयोगटातील २.७ टक्के रुग्ण आढळले आहेत. ५ वर्षांपेक्षा कमी वयोगटात केवळ १.४ टक्के रुग्ण असल्याची नोंद आहे.
२० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे सौम्य किंवा लक्षणेच आढळले नाहीत. शिवाय, या वयोगटातील व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते, मात्र, ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांमध्ये विविध आजार असल्याचेही निदर्शनास आले. नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला