CoronaVirus In Akola : नवा रुग्ण नाही; २१ जणांचेही वैद्यकीय अहवाल ‘निगेटिव्ह’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:41 AM2020-04-21T09:41:11+5:302020-04-21T09:46:24+5:30
२१ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत दोन दिवसांत एकाच कुटुंबातील सलग दोन जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील वातावरण चिंताजनक झाले होते; परंतु सोमवारी आलेल्या २१ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. अद्यापही पाच संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, त्याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४१९ जणांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी प्राथमिक तपासणीचे ३३५, तर ६० फेरतपासणीच्या नमुन्यांचा समावेश आहे. यापैकी आजपर्यंत ४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ३३० प्राथमिक तपासणीचे, तर ६० फेरतपासणीचे अहवाल होते. त्यापैकी सोमवारी २१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्वच निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
यामध्ये आतापर्यंत ३९८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, सद्यस्थिती अकोल्यात तीन रुग्ण पॉझिटीव्ह असून, नव्या रुग्णाची भर नसल्याने अकोलेकरांना दिलासा आहे.
कोरोना बाधितांची प्रकृती स्थिर
सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोरोना बाधित १४ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यातील ११ जणांचे फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या दुसऱ्या फेरतपासणीची प्रतीक्षा आहे.
त्या महिलेचाही अहवाल ‘निगेटिव्ह’
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयात क्वारंटीन कक्षात दाखल कोरोना संदिग्ध एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तत्पूर्वीच त्या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या महिलेचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला.