CoronaVirus in Akola : दोन दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:25 AM2020-04-14T10:25:54+5:302020-04-14T10:25:59+5:30
१५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह््यात सलग दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. विशेष म्हणजे रविवारी २४, तर सोमवारी आणखी १५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली, तरी अकोलेकरांना घरातच थांबा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
अकोल्यासह पातूर तालुक्यात १३ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते, तो भाग प्रशासनाने वेळीच सील केला. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र अशातच रविवारी २४ जणांचे, तर सोमवारी आणखी १५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. सलग दोन दिवसांपासून एकही नवीन बाधित नाही, शिवाय संदिग्ध रुग्ण दाखल होण्याचेही प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत आहे. असे असले, तरी नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
व्हीआरडीएल लॅब : ४२ नमुन्यांची तपासणी
कोरोना विषाणू चाचणीसाठी व्हीआरडीएल लॅब ही कार्यान्वित झाली असून, कामकाजाच्या दृष्टीने या लॅबचा कालचा पहिला दिवस होता. काल या लॅबमध्ये २५ नमुने तपासण्यात आले होते. तर सोमवारी ४२ नमुने तपासण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, अकोला जिल्ह्याचे नागपूर येथे प्रलंबित असलेले सॅम्पल्सही परत अकोल्याला पाठविण्यात आले असून, त्यांचीही चाचणी आता अकोल्यातच होणार आहे. दरम्यान, आज नव्याने जे सॅम्पल घेण्यात आले, त्यात १६ हे अकोल्यातील असून, दोन मात्र खामगाव येथील आहेत, अशीही माहिती देण्यात आली.