CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू, १० पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:17 PM2020-07-11T19:17:59+5:302020-07-11T19:18:22+5:30
शुक्रवार, ११ जुलै रोजी बाळापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला.
अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी बाळापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरानाच्या बळींचा आकडा ९२ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८५९ झाली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी ३५५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये दोन महिला व आठ पुरुष आहेत. यापैकी सहा जण अकोट येथील, दोन जण बाळापूर येथील, तर उर्वरित खडकी-अकोला व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज सायंकाळी एकही पॉझिटीव्ह अहवाल आलेला नाही.
एका महिलेचा मृत्यू
दरम्यान एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ६७ वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला बाळापूर येथील रहिवासी असून दि.३ रोजी दाखल झाली होती.
१४ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन तर कोविड केअर सेंटर मधून १२ अशा १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यात तिघे गंगा नगर येथील, मोठी उमरी, छोटी उमरी व हरिहर पेठ येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित अकोट, घुसर व बाशीर्टाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या दोन जणांपैकी पोळा चौक व बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १८५९ (१८३८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९२ जण (एक आत्महत्या व ९१ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४६४ आहे. तर सद्यस्थितीत ३०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.