CoronaVirus in Akola : दिवसभरात एक मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ३७ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 07:02 PM2020-07-15T19:02:45+5:302020-07-15T19:03:03+5:30
आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९४३ झाली आहे.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १५ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९८ झाली. तसेच आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९४३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात ३१५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २८२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी प्राप्त २६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ११ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. यापैकी साज जण अकोट येथील, पाच जण अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील, अकोल्यातील गोरक्षण रोड भागातील तीन जण, बाळापूर, मुर्तीजापूर व अकोल्यातील रजपूतपुरा भागातील प्रत्येकी दोन यांच्यासह चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, मुर्तीजापूर तालुक्यातील धोत्रा शिंद आणि मुंडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहेत. यामध्ये रजपूतपुरा, पातूर आणि पारस येथील प्रत्येकी दोन तर अकोट येथील एकाचा समावेश आहे.
मुंडगाव येथील वृद्धाचा मृत्यू
मुंडगाव येथील एका ७६ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवार १५ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर रुग्णास १३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा ९८ वर गेला आहे.
३७ जणांना डिस्चार्ज
बुधवारी, दिवसभरात कोविड केअर सेंटर मधून ३२, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओझोन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून प्रत्येकी एक, अशा ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२१५ रुग्णांवर उपचार
आतापर्यंत १६३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्या २१५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.