अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरुच; दिवसभरात एकाचा मृत्यू,५९ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ९७३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 06:38 PM2020-06-12T18:38:19+5:302020-06-12T19:01:53+5:30
शुक्रवार, १२ मे रोजी बाळापूरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
अकोला : विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात कोरोना संसर्गाचा हैदोस सुरुच असून, शुक्रवार, १२ मे रोजी बाळापूरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४४, तर एकूण बाधितांचा आकडा ९७३ वर पोहचला आहे. दरम्यान गत २४ तासात आणखी २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३२३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी १९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १३१ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात, शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन, मोठी उमरी येथील तीन, खदान येथील तीन, रेल्वे क्वार्टर येथिल तीन, गुलजार पुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर तारफैल, संतोषिमातामंदिर जवळ, छोटी उमरी, गीतानगर, विजय नगर, शंकर नगर, भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. त्यात एका दोन महिने वयाच्या बालिकेसह नऊ महिला व एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यातील चार जण हे रंगारहट्टी बाळापूर येथील रहिवासी आहेत. उर्वरीत बाळापुर, सिंदखेड ता. बार्शी टाकळी, विजयनगर, हमजा प्लॉट, चैतन्य नगर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बाळापूरातील एकाचा मृत्यू
गुरुवारी रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेताना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या ४४ वर पोहचली आहे. यापैकी ४३ जणांचा कोविड-१९ आजारामुळे मृत्यू झाला. तर एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे.
२९ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी रात्री नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारनंतर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला . त्यात ११ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ६०६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता ३२३ अॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९७३
मयत-४४(४३+१),डिस्चार्ज-६०६
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२३