CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ पॉझिटिव्ह, २० जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 07:38 PM2020-07-01T19:38:53+5:302020-07-01T19:40:53+5:30
बुधवार, ०१ जुलै रोजी पातूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची व मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, ०१ जुलै रोजी पातूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतांचा आकडा ८० वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १५६८ झाली आहे. दरम्यान, आणखी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी २१२ कोरोना संदिग्धांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.सकाळी प्राप्त ११ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये तीन महिला व आठ पुरुष रुग्ण आहेत. यामध्ये चार जण अकोट येथील, दोन जण गवळीपूरा अकोला, तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, जेल क्वार्टर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला असून अन्य सहा पुरुष आहेत. त्यातले तिघे डाबकी रोड येथील तर अन्य जुने शहर, पोळा चौक, मोठी उमरी, रजपुत पुरा येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पातूर येथील एकाचा मृत्यू
पातुर येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण २४ जून रोजी दाखल झाला होता.
आणखी २० जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर मधून १० अशा २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आलेल्या १० जणांपैकी दोन जण अशोक नगर, दोन जण गुलजार पुरा येथील तर उर्वरित बाळापूर, लहान उमरी, खदान, धोबी खदान, इंदिरा नगर, रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर १० जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात पाच जण अकोट फैल येथील , दोन जण पातूर येथील तर उर्वरीत गितानगर, गंगानगर व गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.