CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; ३४ रुग्ण वाढले, १९ जण बरे झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 06:29 PM2020-08-11T18:29:09+5:302020-08-11T18:29:15+5:30
जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१०१ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व संक्रमित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ११७ वर पोहचला आहे. तर जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१०१ झाली आहे. दरम्यान, १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २३२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित १९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १८ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जण, जोगळेकर प्लॉट, नवीन भिम नगर व पुनोती येथील तीन जण, वाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर शिवर, जिल्हा शल्य चिकत्कस कार्यालय, जूने शहर, अकोट, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सस्ती ता. पातुर येथील तीन जण तर बाजोरिया नगरी येथील एक जण पॉझिटिव्ह आढळू आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
५१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या ५१ वर्षीय पुरुषाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. ही व्यक्ती गंगानगर, बायपास भागातील असून, त्यांना ९ आॅगस्ट रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाचा सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली
१९ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर येथून चार, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, तर आॅयकॉन हॉस्पीटल येथून पाच अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५४० जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५४० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.