CoronaVirus in Akola : दिवसभरात एकाचा मृत्यू; एक पॉझिटिव्ह, ६१ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 06:46 PM2020-06-23T18:46:10+5:302020-06-23T18:46:22+5:30
गत २४ तासात तब्बल ६१ जण कोरोनामुक्त झाल्याने सद्यस्थितीत ३५१ जणांवर उपचार सुरु आहेत.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रकोप सुरुच असून, मंगळवार, २३ जून रोजी बाळापूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अकोला शहरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ६७ वर गेला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२४४ झाली आहे. दरम्यान, गत २४ तासात तब्बल ६१ जण कोरोनामुक्त झाल्याने सद्यस्थितीत ३५१ जणांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात एकूण ११० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोल्यातील दगडी पूल भागातील एक महिला पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.
दरम्यान, बाळापूर शहरातील एका ५० वर्षीय महिलेचा मंगळवारी पहाटे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदर महिलेला १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे आतापर्यंत एकूण ६७ मृत्यू झाल्याची नोंद आहे.
६१ जणांना डिस्चार्ज
सोमवार व मंगळवारी तब्बल ६१ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला.
मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयातून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १० पुरुष व तीन महिला आहेत. त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील लक्ष्मी नगर व तारफैल येथील प्रत्येकी तीन, दोघे विजय नगर येथील तर उर्वरित सिंधी कॅम्प, मलकापूर, डाबकीरोड, चांदुर, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर कोविड केअर सेंटर येथून सोमवार व मंगळवार मिळून ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात वाडेगाव येथील १३, अकोट फैल येथील आठ, शिवर येथील पाच, रंगारहट्टी बाळापूर येथील चार, तर गायत्रीनगर, गुलजारपुरा, चावरे प्लॉट, जठारपेठ, रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन तर शंकरनगर, फिरदौस कॉलनी , मोहता मिल, गितानगर, हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, संत कबीर नगर, बापूनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आतापर्यंत ८२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३५१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल- ११०
पॉझिटीव्ह- एक
निगेटीव्ह- १०९
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४४
मयत-६७ (६६+१), डिस्चार्ज- ८२६
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३५१