CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:17 AM2020-07-08T10:17:47+5:302020-07-08T10:23:22+5:30
अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अकोला शहरासह आता कोरोनाचे संक्रमण हे ग्रामीण भागातही पोहोचले असल्याने रुग्णवाढीचा वेग कायमच आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात १ हजार ७७९ रुग्ण आहेत. रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असला तरी अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. विशेष म्हणजे राज्यातील कोरोनामुक्तीचा दर हा अवघा ५४ टक्के आहे. ही काही प्रमाणात दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये आता ऋतू बदलामुळेही अनेकांमध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. या लक्षणांमुळे घाबरून न जाता आपल्या फॅमिली किंवा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घ्या, गरजेनुसार तपासणी करून घ्या; मात्र सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी सौम्य लक्षणांबाबत तपासणी किंवा संशय असल्यास रीतसर वैद्यकीय चाचणी करवून घेतल्यास कोरोनाचे वेळेत निदान होण्यास मदत होईल. कोरोनाचा संसर्ग झाला, तरी वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण वेळेत बरा होऊ शकतो; मात्र साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन डॉ.सिरसाम यांनी केले आहे.
कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत; परंतु ज्यांना लक्षणे आढळून आली. सोबत त्यांना दुर्धर आजारही आहेत, अशा रुग्णांनी दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घ्यावा. योग्य वेळेत उपचार मिळाल्यास कोरोनातून बरे होऊ शकतात. जिल्ह्यातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.