CoronaVirus In Akola : रिपोर्ट निगेटिव्ह; अदृष्य ताण कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:16 IST2020-04-25T10:13:41+5:302020-04-25T10:16:17+5:30
जिल्ह्यातील वातावरण पॉझिटिव्ह झाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे मात्र कोरोनाचा अदृष्य ताण कायमच आहे.

CoronaVirus In Akola : रिपोर्ट निगेटिव्ह; अदृष्य ताण कायमच!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसून, तब्बल ९५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. शिवाय, संदिग्ध रुग्ण संख्येतही घसरण झाली असून, गुरुवारी सात जणांना कोरोनामुक्त घोषित करून त्यांना सुट्टी देण्यात आली. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील वातावरण पॉझिटिव्ह झाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे मात्र कोरोनाचा अदृष्य ताण कायमच आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १६ वर पोहोचल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती; मात्र दुसरीकडे सलग पाच दिवसांपासून एकाही नवीन रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
अशातच गुरुवारी पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त घोषित केल्याने मोठा दिलासा मिळाला. कोरोनाचे रुग्णही बरे होऊ शकतात, अशी आशा लोकांमध्ये निर्माण झाल्याने जिल्ह्यातील वातावरण पॉझिटिव्ह झाले.
कोरोनामुक्तसोबतच गुरुवारी १८, तर शुक्रवारी २८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याची वाटलाच कोरोनामुक्तीच्या दिशेने असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. असे असले तरी नागरिकांनी घरातच थांबावे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनदेखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोविड केअर सेंटरमधील सद्यस्थिती
निगेटिव्ह अहवाल आलेल्या संदिग्ध रुग्णांना १४ दिवसांसाठी संस्थागत विलगीकरण करून कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाते. सद्यस्थितीत अकोला येथील कोविड केअर सेंटरमध्ये ४८ जण दाखल असून, बाळापूर येथे २८ जण दाखल असे एकूण ७६ जण आहेत. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण १२६ जणांना दाखल करण्यात आले होते. तेथून आतापर्यंत ७८ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
बाळापूर येथील आयटीआयमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अद्याप २८ जण दाखल असून, त्यातील एकाचाही १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. थोडक्यात जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये १५४ जण दाखल होते. त्यातील ७८ जण घरी गेले असून, ७६ जण अजून देखरेखीत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
05 संदिग्ध दाखल
जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या संदिग्ध रुग्णांच्या संख्येतही कमी दिसून येत आहे. शुक्रवारी केवळ पाच संदिग्ध रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आतापर्यंत एकूण 484 अहवाल ‘निगेटिव्ह’
आजपर्यंत ५२२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५०० अहवाल प्राप्त झाले असून, ४८४ अहवाल ‘निगेटिव्ह’ झाले आहेत, तर २२ अहवाल प्रलंबित आहेत. त्यामध्ये ३९४ प्राथमिक तपासणीचे अहवाल आहेत, तर ७६ फेरतपासणी आणि ३० अहवाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहेत.