CoronaVirus in Akola : आणखी सात पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३६२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:13 AM2020-05-23T11:13:52+5:302020-05-23T11:14:51+5:30
सात जणांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या आता ३६२ वर पोहचली आहे.
अकोला : अकोला शहरात कोरोना संसर्गाची घोडदौड कायमच असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक संक्रमित होत आहेत. शनिवार, २३ मे रोजी कोरोनाबाधितांच्या आकड्यात सात जणांची भर पडली असून, एकूण रुग्णसंख्या आता ३६२ वर पोहचली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत १२८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पहिला रुग्ण ६ एप्रिल रोजी सापडल्यानंतर संपूर्ण एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदच होता. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत असून, दिवसागणिक दुहेरी आकड्याने रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५५ होती. यामध्ये शनिवारी आणखी सात जणांची भर पडत हा आकडा ३६२ वर पोहचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी एकूण ३७ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये सहा महिला, तर एका पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे एकट्या फिरदौस कॉलनी भागातील आहेत. तर उर्वरित दोघे हे अनुक्रमणे मानिक टॉकीज जवळ-टिळकरोड व खोलेश्वर भागातील लोहिया नगर येथील रहिवासी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे झाला आहे. तर बाळापूर येथील एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत तब्बल २११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १२८ पॉझिटिव्ह रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आणखी पाच जण कोरोनामुक्त
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी रात्री आणखी पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील, तर उर्वरित तीघे हे अनुक्रमे फिरदोस कॉलनी, आगर वेस व अकोट फैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल- ३७
पॉझिटीव्ह- ०७
निगेटीव्ह- ३०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३६२
मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२११
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२८