CoronaVirus in Akola : सात रुग्ण वाढले; ३४ जण बरे झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:33 PM2020-08-04T18:33:57+5:302020-08-04T18:34:12+5:30
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या २७०८ रुग्णांपैकी २२४३ जणांनी कोरोनावर मात केली असून,सद्यस्थितीत ३५२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला नसला, तरी या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यापेक्षा त्यावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवार, ४ आॅगस्ट रोजी ३४ जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर मुर्तीजापूर येथील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या २७०८ रुग्णांपैकी २२४३ जणांनी कोरोनावर मात केली असून,सद्यस्थितीत ३५२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे ३९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह सात अहवालांमध्ये तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील दोघांसह, जूने शहर, वाडेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये कुणीही पॉझिटिव्ह आढळून आले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुर्तीजापूरात एकाचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यू होणाºयांची संख्या वाढतच असून, मंगळवारी मुर्तीजापूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ३१ जुलै रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
३४ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २६ , कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन , कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन, तर हॉटेल रेजेन्सी येथून तीन अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३५२ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २२४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.