CoronaVirus in Akola : सिंधी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र घोषित; सर्वेसाठी २० पथकांचे गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:57 PM2020-04-26T17:57:23+5:302020-04-26T18:21:39+5:30
सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे.
अकोला: शहराच्या दक्षिण झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ मधील सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठच्या घरात पोहोचली आहे. हा परिसर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला असून, या भागातील स्थानिक रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मनपाचे कर वसुली लिपिक, शिक्षक व आशा वर्कर यांच्या २० पथकांचे गठन करण्यात आले आहे.
संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. ७ एप्रिल रोजी उत्तर झोन अंतर्गत येणाºया प्रभाग क्रमांक ११ येथील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी अकोट फैल परिसरात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला. त्यानंतर बैदपुरा येथील कोरोनाबाधित इसमाच्या कुटुंबातील आणखी तीन लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक दोनचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. यादरम्यान पुन्हा प्रभाग क्रमांक ११ मधील ताजनापेठ परिसरात एका ४५ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर संबंधित मृत्यू झालेल्या इसमाच्या कुटुंबातील आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. एकूणच शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात झाली होती. त्यामध्ये रविवारी दक्षिण झोन अंतर्गत येणाºया सिंधी कॅम्प परिसरातील रुग्णांची भर पडली.
या परिसरात केली नाकाबंदी
महापालिका आयुक्त तसेच नगररचना विभागातील सहायक नगररचनाकार व दक्षिण झोनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे यांनी सिंधी कॅम्प परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी नकाशा तयार केल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षता नगर चौक ते झुलेलाल पाणपोई ते पाटील दूध डेअरी तेथून गादी कारखाना, पक्की खोली परिसर, पेन्शनपुरा, कैलास टेकडी परिसर, मनपा हिंदी-सिंधी मुलांची शाळा क्रमांक १४ चा परिसर तसेच नवीन पोलीस वसाहत आदी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.