CoronaVirus in Akola : ‘ते’ पॉझिटिव्ह रुग्ण परतले होते घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:39 AM2020-05-20T09:39:24+5:302020-05-20T09:39:41+5:30

तातडीने भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू करणे अपेक्षित असताना त्यांच्यावर रात्री ११ वाजेपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली.

CoronaVirus in Akola: 'They' positive patients were back home! | CoronaVirus in Akola : ‘ते’ पॉझिटिव्ह रुग्ण परतले होते घरी!

CoronaVirus in Akola : ‘ते’ पॉझिटिव्ह रुग्ण परतले होते घरी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतरही जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होण्यासाठी उपस्थित झालेल्या रुग्णांना वॉर्ड क्रमांक २४ मध्ये कोणीही दाखल करून घेत नसल्याचे पाहून संबंधित चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घर गाठताच नगरसेवकांसह मनपा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री अकोट फैल परिसरातील भीम चौक परिसरात घडला. या प्रकारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या भीम चौक परिसरातील काही संशयित रुग्णांचे महापालिकेने नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे पाठवले. यापैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल १८ मे रोजी सायंकाळी समोर आला.
प्राप्त अहवालानुसार मनपाच्या मार्फत संबंधित चारही रुग्णांना उपचारासाठी रात्री ८ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
संबंधित रुग्णांना वॉर्ड क्रमांक २४ मध्ये तातडीने भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू करणे अपेक्षित असताना त्यांच्यावर रात्री ११ वाजेपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली. यामुळे संबंधित चारही रुग्णांनी रात्री घर गाठले.
हा प्रकार प्रभागाचे नगरसेवक पराग कांबळे, नगरसेविका चांदणी शिंदे व त्यांचे पती रवी शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत संपर्क साधला. कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून परत आल्याची बाब गंभीरतेने घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी रात्री जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने हालचाली करीत रात्री रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती आहे.

Web Title: CoronaVirus in Akola: 'They' positive patients were back home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.