CoronaVirus in Akola: आणखी तिघांचा मृत्यू; आठ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:51 AM2020-10-13T11:51:55+5:302020-10-13T11:52:05+5:30
आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५९ वर गेला आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. मंगळवार, १३ आॅक्टाबर रोजी पातुर जिल्ह्यातील आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५९ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आठ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८४१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदासपेठ येथील तीन जणांसहत मोठी उमरी, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जिल्हा परिषद कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
दोन पुरुष, एक महिलेचा मृत्यू
मंगळवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये खडकी खदान येथील ६४ वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन येथील ३० वर्षीय महिला व बार्शीटाकळी येथील ५६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. या तिघांनाही अनुक्रमे १२ आॅक्टोबर, पाच आॅक्टोबर व नऊ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.
४०२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,१८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४०२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.