CoronaVirus : अकोला चारशेच्या उंबरठ्यावर; दिवसभरात एकाचा मृत्यू, १९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 06:17 PM2020-05-24T18:17:26+5:302020-05-24T18:24:07+5:30
रविवार, २४ मे रोजी दिवसभरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू आणि १९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
अकोला : कोरोना संक्रमणाचा वेग काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. रविवार, २४ मे रोजी दिवसभरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू आणि १९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मृतकांचा आकडा २४, तर एकूण रुग्णसंख्या ३९७ झाली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत १४४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पाट ठरला आहे. मे महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारपर्यत ३७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. रविवारी दिवसभरातआणखी १९ जणांची भर पडत एकूण आकडा ३९७ झाला आहे. रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून १८५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६६ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १९ जणांमध्ये सात महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच जण हे तेल्हारा शहर व तालुक्यातील आहेत. तर उर्वरित चौघे हे अकोला शहरातील राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट या भागातील आहेत. सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १० रुग्णांपैकी सात जण हे न्यु तारफैल येथील रहिवासी आहेत. तर अन्य शासकीय गोदाम सिंधी कॅम्प, अशोक नगर, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. यामधील एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. दरम्यान, शनिवारी रात्री माळीपूरा भागातील एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला २० मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या मृत्यूमुळे कोरोनाच्या बळींची संख्या २४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १४४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-१८५
पॉझिटिव्ह-१९
निगेटिव्ह - १६६
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३९७
मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२२९
दाखल रुग्ण (?क्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४४