CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ३७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:14 AM2020-07-21T10:14:08+5:302020-07-21T10:14:20+5:30
आरटीपीसीआर चाचणीमध्ये पाच, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचणीमध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही या संसर्गजन्य आजाराचा हैदोस सुरूच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवार, २० जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर आणखी ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीमध्ये पाच, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचणीमध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०५ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या २,१७२ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, हे रुग्ण अकोल्यातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वॉर्टर, खेतान नगर व जीएमसी येथील आहेत.
अकोला शहरातील दोघांचा मृत्यू
रविवारी रात्री अकोला शहरातील दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी एक ६० वर्षीय पुरुष गुलजारपुरा भागातील असून, दुसरा ६६ वर्षीय पुरुष लक्ष्मीनगर भागातील आहे. या दोघांनाही ११ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
२५ जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, कोविड केअर सेंटर येथून १४, ओझोन हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून एक अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३१४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१७२ असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३१४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.