CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ३९ नवे ‘पॉझिटिव्ह!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:17 AM2020-07-24T10:17:20+5:302020-07-24T10:17:27+5:30
गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला, तर ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा २,३१७ वर, तर मृतकांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला, तर ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये २३ व्हीआरडीएल लॅबचे, तर १६ अहवाल रॅपिड अॅन्टिजेन टेस्टचे आहेत.
महानगरानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ५२ वर्षीय महिला असून, ती आमिनपुरा अकोट येथील रहिवासी होती. ती २० जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली होती. तर दुसरा मृत्यू बोरगाव मंजू येथील ५० वर्षीय महिलेचा झाला. ही महिला ७ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. या सोबतच गुरुवारी व्हीआरडीएल लॅबमधून प्राप्त अहवालानुसार, २३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पाच महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील नऊ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण पळसोबढे येथील, दोन जण सिंदखेड येथील, बोरगाव मंजू, हैदरपुरा खदान, मूर्तिजापूर, रामनगर, पातूर, सरस्वती नगर, नित्यानंद नगर, जीएमसी व सेवरा अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,३१७ वर पोहोचली आहे.
दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, तर कोविड केअर सेंटरमधून ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच मूर्तिजापूर येथील कोविड रुग्णालयातून १२ जणांना तसेच खासगी रुग्णालय आणि हॉटेल्समधून १३ असे एकूण ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.