CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ७८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ७६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 01:06 PM2020-06-28T13:06:09+5:302020-06-28T13:08:10+5:30
रविवार, २८ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुुरुच असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमखी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २८ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर तब्बल ७८ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ७६ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १४९८ झाली आहे.
विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ३३३ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे.
उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. यामध्ये पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शीटाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आणखी दोघांचा मृत्यू
रविारी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण २६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून, तो १४ रोजी दाखल झाला होता. त्याचा शनिवरी रात्री मृत्यू झाला.
प्राप्त अहवाल-३३३
पॉझिटीव्ह अहवाल-७८
निगेटीव्ह-२५५
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४९८
मयत-७६ (७५+१)
डिस्चार्ज-१०४७
दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७८