CoronaVirus In Akola : बाधित नाही; ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:26 AM2020-04-01T10:26:58+5:302020-04-01T10:29:33+5:30
जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.
अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला, तरी संशयित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाच्या संशयावरून मंगळवारी आणखी सात नवे रुग्ण दाखल झाले असून, एकूण ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. तर अकोट येथील रुग्ण निगेटिव्ह असल्याने त्याला सुटी देण्यात आली. बुलडाण्यात कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दि. ७ मार्च रोजी पहिला संशयित रुग्ण दाखल झाल्यापासून आतापर्यंत संशयितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये अकोट येथील एका रुग्णाचा समावेश असून, त्याला मंगळवारी सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित असून, यामध्ये सोमवारी दाखल झालेले चार संशयित रुग्ण व मंगळवारी दाखल झालेल्या सात रुग्णांचा समावेश आहे. यातील तीन रुग्णांवर अतिदक्षता कक्षात, तर उर्वरित रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.
१८० रुग्णांची वैद्यकीय तपासणी कोरोना समुपदेशन कक्षात मंगळवारी १८० रुग्णांची तपासणी करून त्यांना समुपदेशन करण्यात आले. कक्ष सुरूझाल्यापासून आतापर्यंत २ हजार ७४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
घाबरून जाऊ नका; घरातच थांबा!
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ आजारासाठी रुग्णालयात येणे टाळण्याच्या सूचना देऊनही लोक भीतीपोटी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले. यावेळी बहुतांश रुग्ण साधी डोकेदुखे, सांधेदुखी, पाठदुखीसारख्या समस्या घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.