CoronaVirus : समन्वयाच्या अभावाने बिघडली अकोल्याची स्थिती - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:14 AM2020-06-16T10:14:32+5:302020-06-16T10:15:06+5:30
आमचं सरकार असतं तर परिस्थती वेगळी असती, असा टोलाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्य सरकारला लगावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील कोरोनाबाधितांची स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत आहे. केवळ एक घटक या परिस्थितीला सावरू शकत नाही, सर्वांचे सहकार्य व समन्वय या माध्यमातूनच कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकता येईल. दुर्दैवाने अकोल्यात प्रशासनामध्ये नसलेल्या समन्वयामुळे स्थिती गंभीर झाली आहे, असा आरोप करत आमचं सरकार असतं तर परिस्थती वेगळी असती, असा टोलाही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्य सरकारला लगावला.
केंद्र शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्य अहवाल देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महानगरांमध्ये होत आहे. अकोलाही त्याला अपवाद नाही. अकोल्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक असून, राज्य शासन व स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच येथील स्थिती बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. अकोल्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचा सर्वाधिक ताण हा शाासकीय महाविद्यालयावर येऊन ठेपला आहे. दुसरीकडे सुपर स्पेशालिटीची इमारत बांधून तयार आहे. येथे आवश्यक ती पदभरती करून हे हॉस्पिटल सुरू केले असते तर आताच्या परिस्थतीत रुग्णांसाठी त्याचा मोठा लाभ झाला असता; मात्र वेळावेळी पाठपुरावा करूनही राज्य शासनाने या हॉस्पिटलबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या आघाडीवर राज्य शासनाची कामगिरी ही ‘उत्तम’ आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. प्रशासन व शासन यांच्यामध्ये समन्वय हवाच; मात्र नागरिकांनीही अलगीकरणाची प्रक्रिया गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत पुढील दिवसांमध्ये आता स्वत: कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजना व नियोजनावर लक्ष ठेवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.