CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; आठ पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ३९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:48 PM2020-06-08T18:48:07+5:302020-06-08T18:53:56+5:30
सोमवार, ८ जून रोजी दिवसभरात आणखी दोघांचा मृत्यू झाला. तर आठ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सोमवार, ८ जून रोजी दिवसभरात आणखी दोघांचा मृत्यू झाला. तर आठ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३९ वर गेला आहे. तर एकूण रुग्णसंख्याही ८२१ झाली आहे. दरम्यान, आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या २३७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. रविवार, ७ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८१३ होता. त्यामध्ये सोमवारी आठ जणांची भर पडत हा आकडा ८२१ वर पोहचला आहे. सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १०६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ९८ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात एक महिला व सात पुरुष पॉझिटिव्ह आहेत. त्यातील दोन जण रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित बलोदे ले आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर,माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.
दोघांचा मृत्यू
सोमवारी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एक जण नायगाव येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्याला तीन जून रोजी दाखल करण्यात आले होते. दुपारी हैदरपूरा खदान येथील ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेस दोन जून रोजी दाखल करण्यात आले होते.
आणखी पाच जणांना डिस्चार्ज
आज दुपारी आणखी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात एक महिला व अन्य चार पुरुष रूग्ण आहेत. त्यातील दोन जणांना घरी तर उर्वरित तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघे जण सिटी कोतवाली परिसरातील तर अन्य देशमुख फैल व गायत्री नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
२३७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ८२१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३९ जण (एक आत्महत्या व ३८ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज पाच जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ५४५ झाली आहे. तर सद्यस्थितीत २३७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.