CoronaVirus : आणखी एकाचा मृत्यू; आठ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा १०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:04 PM2020-07-26T12:04:21+5:302020-07-26T12:04:46+5:30
रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला, तर आठ नवे पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच असून, या आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला, तर आठ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०१ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४०८ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२९ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दोन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. यामध्य सय्यदपुरा पातूर येथील तीन जण, दिवाली मैदान पातूर येथील दोन जण, तर रामनगर, चिंचखेड ता. बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
रविवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा रुग्ण इकबाल कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्यांना २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.
३४२ अॅक्टिव्ह रुग्ण दाखल
आतापर्यंत १९६६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुुरु आहेत.