CoronaVirus: आणखी एकाची वैद्यकीय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:39 PM2020-03-14T12:39:57+5:302020-03-14T12:40:12+5:30
कझाकिस्तान येथून आलेल्या एका नागरिकाला शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदेशातून आलेल्या आणखी एका व्यक्तीने शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय गाठले. त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याचे नमुने घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी कझाकिस्तान येथून आलेल्या एका नागरिकाला शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले होते. या व्यक्तीची अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे आणि डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी तपासणी केली. तसेच पुढील १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्यात.
दरम्यान, विदेशातून येणारे लोक येथे वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय गाठत आहेत; परंतु या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांना थेट बाह्यरुग्ण विभागातच रांगेत उभे राहावे लागत आहे. इतर रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने अनेकांना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘ओपीडी’ बंद; तुम्ही उद्या या!
कझाकिस्तान येथून आलेल्या एका व्यक्तीला शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते; परंतु ती व्यक्ती येण्यापूर्वीच येथील बाह्यरुग्ण विभाग बंद झाला होता. वैद्यकीय तपासणीसंदर्भात त्या व्यक्तीने एका कर्मचाऱ्यास विचारले असता ‘ओपीडी बंद झाली; तुम्ही उद्या या’, असे उत्तर त्या व्यक्तीला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी डॉ. अष्टपुत्रे यांना माहिती दिली व त्यानंतर वैद्यकीय तपासणीस सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या एका व्यक्तीची शुक्रवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली असली, तरी विदेशातून येणाºया इतर व्यक्तींप्रमाणे त्यांनाही आवश्यक सूचना दिल्या आहेत.
- डॉ. शिवहरी घोरपडे,
अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.