CoronaVirus : कोरोनाचा आणखी एक बळी; १८ नवे पॉझिटिव्ह, ४१ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:13 AM2020-05-13T11:13:19+5:302020-05-13T11:14:57+5:30
बुधवार, १३ मे रोजी आणखी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अकोला : कोरोना संसर्ग काही केल्या नियंत्रणात येत नसून, दररोज मोठ्या संख्यने रुग्ण आढळून येत आहे. बुधवार, १३ मे रोजी आणखी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मंगळवार, १२ मे च्या रात्री एका कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८६ झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा मृतकांचा आकडाही १४ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सकाळी देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी रात्री ४१ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृतकांच्या संख्येतही भरच पडत आहे. बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण १२० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित १०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या १८ रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉट मधील रहिवासी आहेत. तर तिन जण गवळीपुरा, तीन जण रामनगर येथील आहेत. तर बापू नगर अकोट फैल, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आळसी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. सोमवार, ४ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या न्यू भीमनगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा मंगळवार, १२ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींचा आकडा १४ झाला आहे. जिल्ह्यात १५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी १४ जण कोविड-१९ आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.
६० जण कोरोनामुक्त
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवरार, १२ मे रोजी दुपारी ५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर रात्री आणखी ४१ जणांना सुटी देण्यात आली. रुग्ण सिंधी कॅम्प, कृषि नगर, अकोट फैल व बैदपूरा येथील रहिवासी आहेत. त्यापूर्वी १४ जण कोरोनामुक्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ६० जणांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे.
आज प्राप्त अहवाल-१२०
पॉझिटीव्ह-१८
निगेटीव्ह-१०२
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १८६
मयत-१५(१४+१),डिस्चार्ज- ६०
दाखल रुग्ण(पॉझिटिव्ह)- १११